About and History
परभणी शहरातील अत्यंत नामांकित शैक्षणिक संस्था असलेल्या बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेची स्थापना एका शिकवणी वर्गातून झाली. गरजू मुलांना शिक्षण देण्याचा ध्यास घेतलेल्या कै. म. श. शिवणकर गुरुजींनी परभणी शहरातील भविष्याचा वेध व शिक्षणाची जाण असणाऱ्या मंडळींच्या सहकार्याने बाल विद्यमंदिर शिक्षण संस्थेची सन 1967 मध्ये स्थापना केली.
संस्थेचे प्रथम अध्यक्ष स्व. फिरोजशा पारख यांनी संस्थाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर संस्थेच्या प्राथमिक शाळेसह माध्यमिक विभागाला प्रारंभ झाला.
कालांतराने या परभणी शहरातील वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक असलेल्या स्व. डॉ. पांडुरंगजी नावंदर यांची शैक्षणिक क्षेत्राविषयीची प्रचंड तळमळ पाहून या ध्येयवेड्या व्यक्तिमत्त्वाला सन 1980 मध्ये संस्थेचे संचालक म्हणून निवडण्यात आले. पुढे त्यांनी पूर्णवेळ स्वत:ला शैक्षणिक कार्यासाठी वाहून घेतले. त्यांचे संस्थेविषयी असलेले सर्मपण, कामाविषयीची तळमळ, सुसुत्रता व काटेकोर नियोजन यामुळे मंडळाने उपाध्यक्ष व कालांतराने चिटणीस पदाची जबाबदारी त्यांच्यावर आली.
सन 2000 पासून डॉ. पांडुरंग नावंदर हे सर्वानुमते संस्थेचे अध्यक्ष झाले. आपल्या श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी विद्यार्थीहित डोळ्यासमोर ठेवून या शैक्षणिक संस्थेचा नावलौकिक महाराष्ट्रात निर्माण केला.
कै. म. श. शिवणकर व कै. फिरोजशा पारख व तत्कालीन संचालक मंडळाने लावलेल्या या शैक्षणिक रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर आणि संवर्धन करण्याचे काम स्व. डॉ. पांडुरंगजी नावंदर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पूर्णत्वास नेले. या कार्यात त्यांना त्यांच्या अर्धांगिनी तथा संस्थेच्या उपाध्यक्षा प्रा. वासंतीताई नावंदर यांची मोलाची साथ लाभली. उपाध्यक्षा म्हणून त्यांनी संस्थेतील विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे दिले. किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली. शिक्षकांसाठी तर नेहमीच उत्तम मार्गदर्शकाची म्हणून भूमिका निभावली.
मागील साठ वर्षांच्या इतिहासात बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांचे सर्वांगीण हित डोळ्यासमोर ठेवून शैक्षणिक वाटचाल केली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना संस्कारीत करण्यावर भर दिला. त्यांच्या सर्वांगीण गुणांना विकसित करणे व समाजात उत्तम नागरिक घडवणे हे काम संस्था सातत्याने करीत आहे. म्हणूनच बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे विद्यार्थी भारतातील विविध राज्यांसह जगातील अनेक देशांत शैक्षणिक गुणवत्तेच्या बळावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवताना दिसतात. ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांना संस्कार देणारे हे विद्यापीठच आहे.
माजी अध्यक्ष स्व. डॉ. पांडुरंग नावंदर यांच्या दूरदृष्टीने भविष्याचा वेध घेणारे संस्थात्मक शैक्षणिक संकुल उभे राहिले. परभणी शहरात बाल विद्यामंदिर प्राथमिक व हायस्कूल विभागाची एक शाळा वैभवनगर येथे सुरू करण्यात आली. संस्थेने सन 1986 मध्ये कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सुरू करून उच्च माध्यमिक शिक्षणाची शिस्तबध्द व्यवस्था विद्यार्थ्यांसाठी केली.
संस्थेच्या शैक्षणिक अभिनव कार्यामुळे बालविद्यामंदिर प्राथमिक व माध्यमिक शाळा ही पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या मनातील आवडीची शाळा म्हणून ओळखली जाते. भविष्याचा वेध घेऊन संस्थाचालकांच्या दूरदृष्टीने परभणी शहरातील पहिली सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याचा मान बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेला जातो.
2005 मध्ये इंग्रजी माध्यमाच्या धर्तीवर अंबिका नगर येथे सेमी इंग्रजी माध्यमाची बाल विद्याविहार प्रशाला स्थापन करण्यात आली. अल्पावधीतच 2013 मध्ये इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू केले. आज या शाखेत नर्सरी ते दहावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते.
शैक्षणिक विकासाची गतिमानता ओळखून परभणी शहरात दर्जेदार सी. बी. एस. ई. बोर्डाच्या इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणारी बाल विद्यावर्धिनी इंग्लीश स्कूल, धर्मापूरी येथे उभारली. सन 2014-15 या शैक्षणिक वर्षात उभारण्यात आली. कल्याण नगर येथील किरायाच्या जागेतून प्रारंभ झालेली ही शाळा आता धर्मापूरी येथे संस्थेच्या स्वत:च्या मालकीच्या इमारतीमध्ये उभी आहे.
आज बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेत 6000 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी शालेय गुणवत्तेबरोबरच स्पर्धा परीक्षा, विज्ञान–तंत्रज्ञानातील आधुनिक ज्ञान, सहशालेय उपक्रम, वक्तृत्व, वादविवाद, संगीत, नृत्य, चित्रकला, क्रीडा इत्यादी क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपले नाव कोरले आहे.
विद्यार्थ्यांना विविध ज्ञान क्षेत्राची ओळख व्हावी म्हणून प्रशालेच्यावतीने संस्थेचे संस्थापक कै. म. श. शिवणकर यांच्या नावे विभागीय वक्तृत्व स्पर्धा, संस्थेचे माजी अध्यक्ष कै. फिरोजशा पारख यांच्या नावे जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा, संस्थेचे माजी अध्यक्ष स्व. डॉ. पांडुरंगजी नावंदर यांच्या नावे “स्व. डॉ. पांडुरंगजी नावंदर ज्युनिअर जिनिअस विभागीय प्रश्नमंजुषा स्पर्धा“, तसेच माजी उपाध्यक्षा स्व. प्रा. वासंतीताई नावंदर यांच्या जन्मदिनी सर्व कर्मचाऱ्यांसाठी आत्मचिंतन दिन आयोजित केला जातो.
संस्थेने सर्व विभागांच्या सुसज्ज इमारतीसह समृद्ध ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज संगणक कक्ष, सांस्कृतिक सभागृह यांची स्वतंत्र निर्मिती केलेली आहे.
संस्थेच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने संस्थेचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
आजमितीस संस्थेची शैक्षणिक वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे. ज्ञानसंपन्न शिक्षण ही संस्थेची परंपरा कायम राहिली आहे. विद्यार्थ्यांना एकाच छताखाली सर्व प्रकारचे शिक्षण घेता यावे म्हणून संस्थेने 2024-25 पासून बाल विद्या फाउंडेशनची उभारणी केली आहे.
सध्या संस्थेचे अध्यक्ष डॉ. एन. ए. झरकर, सचिव डॉ. विवेकजी नावंदर व सर्व संचालक मंडळ संस्थेचा वसा आणि वारसा यशस्वीपणे चालवताना दिसून येतात.
